Monday, January 31, 2011

तुझ्या रूपाचे सागरदर्शन.

तुझ्या रूपाचे सागरदर्शन
नकळत होता जागी थिजलो,
लाटा होऊन येशी धावत
तुषारांत त्या भिजून हसलो.
खोल तुझ्या डोळ्यांत पाहता
बुडत चाललो,पाय ठरेना;
केसांच्या पाशात अडकलो
अंधारी या काठ कळेना!
मावळतीच्या सूर्याकडुनी
सोनपिसारा मागून घेशी,
अन रातीला दूधचांदणे
चंद्राला त्या उसने देशी!
ऋतुचक्राची हसरी सृष्टी
तुझ्याच साठी फिरून येते,
स्पर्श तुला ती करते आणि
स्वतःच सुंदर होऊन जाते..!!!

-स्पृहा.

Monday, January 24, 2011

स्वरभास्कर.

८९ वर्षं आपल्या अलौकिक स्वरतेजाने तळपून एक संगीत सूर्य आज अखेर मावळला. भारतरत्न स्वराधीश पंडित भीमसेन जोशी यांचं वृद्धापकाळाने आज निधन झालं.. वयाच्या अकराव्या वर्षी गाणं शिकण्याचा खडतर प्रवास सुरु झाला. कुंदगोळ येथे साक्षात 'सवाई गंधर्व' त्यांना गुरु म्हणून लाभले.गुरूगृही राहून, सोळा-सोळा तास रियाज करून त्यांनी 'किराणा'घराण्याच्या गायकीचे धडे घेतले. पहिली जाहीर मैफल त्यांनी वयाच्या केवळ १९व्या वर्षी पुण्याच्या हिराबागेत केली. त्यांची लोकप्रियता आणि त्यामुळे संगीत मैफिलींसाठी करावी लागणारी त्यांची धावपळ वाढली. त्यांच्या त्या काळी वारंवार होणार्‍या विमान प्रवासांमुळे, त्यांना पु.ल.देशपांडे यांनी गमतीने 'हवाईगंधर्व' ही पदवी बहाल केली होती. कित्येक वेळा एकाच दिवसात दोन शहरांतील मैफली घेण्यासाठी ते दोनदा विमानप्रवास करीत.'संतवाणी' या नांवाने मराठी अभंगगायनाचे अ़क्षरशः हजारो कार्यक्रम केले;ज्याचं निरुपण करत असत-कवी वसंत बापट. भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशींचे वैशिष्ट्य असे की ते दक्षिण भारतात प्रचलित असलेल्या कर्नाटकी गायनातल्या चीजा हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवीत. त्यामुळे त्यांचे गायन कर्नाटकी संगीताची परंपरा असलेल्या दक्षिणी भारतातही, विशेषतः तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाले.

भीमसेन जोशींना अ॑नेक पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरविण्यात आले. त्यांतले काही इ.स. १९७२ साली मिळालेला पद्मश्री पुरस्कार, इ.स. १९७६ सालचा संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार, आणि इ.स. १९८५सालचा पद्मभूषण पुरस्कार हे आहेत. जयपूर येथील गंधर्व महाविद्यालयाने त्यांना संगीताचार्य ही पदवी दिली तर पुण्याच्या टिळक विद्यापीठाने डि. लिट्. ही पदवी दिली. इतर पुरस्कारांमध्ये पुण्यभूषण पुरस्कार,स्वरभास्कर पुरस्कार, तानसेन पुरस्कार इत्यादींचा समावेश आहे. पुणे आणि गुलबर्गा येथील विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ने सन्मानित केले आहे. नोव्हेंबर ४, २००८ रोजी भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचे जाहीर केले.
त्यांनी सुरू केलेला सवाई गंधर्व संगीत महोत्सव हा भारतातील एक मोठा संगीतोत्सव समजला जातो. पुणे विद्यापीठाच्या ललित कलाकेंद्रात पंडित भीमसेन जोशी यांच्या नावाने अध्यासन स्थापण्यात आले आहे. त्यांनी केलेल्या संगीताच्या सेवेमुळे भारतीय शास्त्रीय संगीतात पंडित भीमसेन जोशींचे स्थान अजरामर झाले आहे.
त्यांना ही अल्पशी श्रद्धांजली!!


सादर वंदन तव चरणांशी करतो  स्वरभास्करा,
होतसे जीव आज कापरा...!!

 जाहले पोरके संगीताचे जग,
अन वाद्यांनाही नावरतो आवेग,
राहील परी तव सूर इथेच अभंग.

विलीन होशी अनंतात तू तळपून स्वरभास्करा,
आमुचा शेवटचा हा मुजरा..!!

- स्पृहा.

Tuesday, January 18, 2011

स्वप्नं.

स्वप्नं पाहणं,फारच 
फायद्याचं असतं नाही?
तुम्हाला 'ज्या' हव्या आहेत,
'जशा' हव्या आहेत,
तशाच पाहता येतात गोष्टी.
भविष्यात डोकावता येतं,
भूतकाळात रमता येतं.
आणि मनासारखं नसलंच काही;
तरी 'हे शेवटचं नाही',
याची खात्री असतेच!
क्वचित दिशासुद्धा दिसते
पुढच्या प्रवासाची.
नाहीतर आपलंच आयुष्य
दिसत राहतं एखाद्या 
चित्रपटासारखं..
संथपणे एक एक रीळ
उलगडत गेल्यासारखं!
आपण बनतो ज्युरी,त्रयस्थ;
किंवा उरतो प्रेक्षक,भान विसरलेले.
स्वप्नं आपल्याला सांगू 
पाहत असतात काही,
आपण त्यांना सांगू दिलं तर!
पण आपल्यातला हुकूमशहा,
तो मात्र स्वप्नातसुद्धा 
जागाच असतो;         
बोलक्या स्वप्नांना,तो
लागलीच गप्प करतो.
हळूहळू स्वप्नं मग 
मुकी होत जातात,
आपल्या अडाणीपणाला 
स्वप्नातच हसत राहतात..!!!

-स्पृहा.

Wednesday, January 12, 2011

जाग

आज लवकर जाग आली;
काही विचारांसोबत,
जे आधीच आहेत काळाच्या फार आधीचे.
कालबाह्य..कदाचित!
आता वाटतंय 'जागं' व्हायला
फारच उशीर झाला.
घायाळ मी,
विचारातल्या चित्रांनी.
अशक्यप्राय वाटणाऱ्या स्वप्नांना
गवसणी घालण्याची केविलवाणी धडपड
करणं,करतंच राहणं;
त्यांच्याचबरोबर जगणं,
जमवून घेणं...
मी तयार नाही अजून
एवढ्या उलथापालथीला!
हा शाप आहे,की वरदान??
की दोन्हीच्या मधलंच काहीतरी..
जाणारा काळसुद्धा मला उत्तरं 
सोपी करून सांगत नाही,
हेच कठीण जातंय.. 
शापच हा..किंवा,
शापदग्ध असण्याचं वरदान!
नाहीतर,पाण्यातच आकंठ राहूनही
तहानलेलंच राहणं,
किती जणांना जमतं..??!!

-स्पृहा.

Tuesday, January 11, 2011

इतिहासाच्या सत्यापासून.

इतिहासाच्या सत्यापासून,
माझ्यातल्या भीतीपासून,
वेगळा झालो आहे;
मन माझं मेल्यापासून,
आदळणारया शब्दांपासून,
वेगळा झालो आहे.

आशेच्या शक्तीपासून,
वैराच्या वणव्यापासून,
दूर गेलो आहे;
अंधाऱ्या वाटेपासून,
उरफोड्या धावेपासून,
दूर गेलो आहे.

भविष्याच्या स्वप्नांपासून,
मानवतेच्या शाळेपासून,
मागे आलो आहे;
प्रेमाच्या चकव्यापासून,
'मरण्या'आधीच 'जगण्या'पासून,
मागे आलो आहे.

समाज,समाज म्हणणाऱ्यांनी
जातीबाहेर टाकलं होतंच;
'माणूस'याच जातीपासून 
आता बाहेर आलो आहे...!!
इतिहासाच्या सत्यापासून,
माझ्यातल्या भीतीपासून,
वेगळा झालो आहे..

-स्पृहा.

Sunday, January 9, 2011

अजून आहे तिथेच राधा..!!

अजून आहे तिथेच राधा,
अजून आहे भरले गोकुळ;
श्यामनिळ्याच्या आठवणींनी 
अजूनही मन होते व्याकूळ!

यमुनेच्या काळ्या डोहावर
अजून उठती तुझे तरंग,
अजून वाऱ्यावरुन येती
मुरलीचे ते सूर अनंग.

अस्तित्वाच्या रूढार्थाला 
छेदून जाते तुझीच छाया,
'अनया'च्याही मनात दाटे
तुझीच अनवट काजळमाया!

जगणे सारे निळेच माझे,
'प्रेमयोग'हा तुझा मुकुंदा;
विरत चालले भरले गोकुळ,
अजून आहे तिथेच राधा..!!

-स्पृहा .

Tuesday, January 4, 2011

सिग्नल

माझ्या अतिशय 'बिझी' आयुष्यात 
गर्दीच्या रस्त्यावरून वाट काढत 
गाडी चालवत असताना,
नेमका 'सिग्नल' लागला.
'भयंकर फ्रस्ट्रेट' झाले.
(आताशा असं अगदी पटकन होतं मला..!!)
तेवढ्यात जरा इकडे-तिकडे बघत असताना..कोणीतरी दिसलं..
अंग चोरून कोपऱ्यात उभं..
टक लावून माझ्याकडे पाहत!
गेल्यावर्षीची माझी "न्यू इयर रेझोल्युशन्स" होती ती!!
एका महिन्यातच विरून गेलेली..
मी अनोळखीपणे त्यांच्याकडे पाहताना बघून 
केविलवाणं हसली!
मी एकदम अवघडले;
यांना ओळख द्यावी तरी पंचाईत,
न द्यावी तरी..!!
आनंद,आश्चर्य,अपराधीपण..
सगळ्या भावांनी कोंदून गेला घसा.
त्यांच्यापाशी जावं,न जावं..
किती काळ लोटलाय यांना शेवटचं भेटून.
तशी अजूनही टवटवीत दिसत होती;
पण जराशी थकलेली!
हात जरासा लांबवला,
तरी कवेत येतील अशी!
छे छे..यांना असं वाटेत नाही टाकायचं;
उघड्यावर नाही सोडायचं.
आपलंसं करायचं त्यांना.
म्हणून उतरले गाडीवरून,
इतक्यात सिग्नल 'हिरवा' झाला;
माझ्या 'बिझी' आयुष्याचा..!!

-स्पृहा. 

Monday, January 3, 2011

एका लग्नाची गोष्ट..

    नाही,नाही..मी खूप गाजलेल्या त्या नाटकाबद्दल बोलत नाहीये...काही दिवसांपूर्वी एक वेगळीच गोष्ट वाचनात आली..ह्युग हेफनर (Hugh Hefner) नावाच्या अब्जाधीशाने त्याची नात शोभेल अशा क्रिस्टल हार्रीस (Crystal Harris)नावाच्या मुलीला लग्नासाठी मागणी घातली..(लग्न नातवासोबत नव्हे..त्याच्यासोबत करण्यासाठी..!!) त्यामुळे त्याच्यावर टीकेची राळ उठली आहे.आणि लोक तोंडाला येईल ते बडबडताहेत. म्हणजे हे लग्न मुळातच कसं चुकीचं आहे..हा प्रकार किती भयंकर आहे वगैरे वगैरे!!बरं,या टीकाकार बोल बच्चनांपैकी कुणीच नवपरिणीत जोडपं खूष आहे का,त्यांचं आपसात बरं चाललंय का..अशा 'निरर्थक' गोष्टींवर विचार करण्याची तसदी घेतलेली नाही..बरं मुळात हे दोघं सज्ञान आहेत;आणि लग्न करायचं,नाही करायचं, कसं करायचं,कुणाशी करायचं हा पूर्णपणे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.  किती विचित्र आहे नं.. एकाचवेळी जे जग आपल्या व्यक्तीस्वातंत्र्य,निर्णयस्वातंत्र्य यांचा डांगोरा पिटत असतं,ते अचानक किती कुचाळक्या करणारं,कुजकट बनतं.
    यावर 'स्वतंत्र 'पणे विचार करावासा वाटतोय मला.. आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीवर हे योग्य;ते अयोग्य असा शिक्का मारणाऱ्या सर्वांपासून बाजूला होऊन...खरंच  हेफनर आणि क्रिस्टलने जे केलं,त्यावर टीका व्हायला हवी होती? प्रत्येक धर्मामध्ये स्वतंत्रपणे विकसित होत गेलेलं 'लग्न' नावाचं एक बंधन. माणसाच्या सांस्कृतिकतेचं प्रतिक. व्यक्तिस्वातंत्र्याच्या रेट्यात पुसट होत चाललेलं..मग अशात या दोघांनी लग्नबंधनावर,एकमेकांवर जो विश्वास दाखवला; कमिटमेंटची जी तयारी दाखवली,त्याबद्दल त्यांचं कौतुक व्हयला हवं!!!हां...चर्चा लग्नाला घेऊन  नाही...त्यांच्या वयातल्या प्रचंड फरकाबद्दल  असू शकते..पण "प्रेम आंधळं असतं" हा सिद्धांत लक्षात घेतला की झालं!!"काही जणांनी तर सेक्स आणि ऐहिक सुखं या एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते एकत्र आले.." अशीही विशेष टिप्पणी केली...काहीही असू दे की..हे जे काही आहे ते त्या जोडप्यांना, त्यांचं त्यांना ठरवू दे की...आयुष्यभराची साथ आणि नात्यांचं आवरण जरा बाजूला सारून पहा...लग्नाचा मूळ उद्देश शेवटी हाच असतो नं.. कोणत्याही देशात,कोणत्याही धर्मात,कोणत्याही संस्कृतीत..
     इतर सगळं बाजूला ठेवूया.. पण लोकांच्या आयुष्यात त्यांनी काय करायचं,कसं वागायचं याचे धडे देणारे आपण कोण?काय अधिकार आहे आपल्याला?? बरं हे सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत असंही काही नाही..हे म्हणजे 'आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं वाकून' असं झालं! हे अगदी साफ नामंजूर आहे मला...आणि म्हणूनच  हेफनर  आणि क्रिस्टलला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत..लग्नासाठी आणि आपल्या निर्णयावर जगाला काय वाट्टेल ते वाटलं तरी,त्याची अजिबात तमा न बाळगता ते ठाम राहिले म्हणून.. Wish them a very happy married life!!इति एका लग्नाची गोष्ट,साठां उत्तरी सुफळ संपूर्ण!!!!