Wednesday, February 24, 2016

‘डूडल डायरी’

मध्यंतरी ‘काळा घोडा फेस्टिव्हल’ला गेले होते. मला आवडतं अशा ठिकाणी. खूप वेगवेगळे रंग, वेगवेगळ्या कल्पना.. सुंदर संमेलन असतं.. तऱ्हेतऱ्हेचे लोक दिसतात.. त्यांच्या गप्पांचे विषय.. त्यांचे कपडे.. मध्येच अतिशय सुंदर अशा शिल्पकृती, पेंटींग्ज, आणि मोकळी हवा! मस्त मजा आली.. आपलं रुटीन बदलावंसं वाटत असेल न, तर मधूनच अशा एखाद्या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी.. फार ताजंतवानं वाटायला लागतं. आणि या सगळ्या पलीकडे जाऊन मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे खरेदी!! ती मनसोक्त करता येते..आणि गोष्टी तरी किती वेगवेगळ्या.. साड्या, कुर्ते हे नेहमीचं झालंच, पण छोटे छोटे दिवे, बिलोरी आरसे, कोरीव बांगड्या, छोटेसे बुकमार्क्स, हाताने रंगवलेली कानातली, सुवासिक साबण, वॉल हँगिंग्स कितीतरी गंमतीच्या गोष्टी.. कितीतरी वेळ हे सगळं नुसतं बघण्यातच मजेत  निघून जातो. या वेळेस माझ्या खजिन्यात किती नव्या नव्या गोष्टी आल्या.. ‘मधुबाला’चं चित्र असलेली सुंदर बॅग, एक राखाडी निळं जॅकेट, आदिवासी बायका घालतात तसलं डोरलं, शेरलॉक आणि गँग्ज ऑफ वासेपूर मधल्या फैझलची चित्रं.. मजा नुसती.. आणि या सगळ्या खजिन्यात मला सगळ्यात आवडलेली एक गोष्ट आहे ती म्हणजे एक डायरी. ‘डूडल डायरी’.
मस्त आहे ही डायरी.. फिरता फिरता एका स्टॉलवर सहज हाताला लागली. आता खरंतर डायरी सारखी डायरी. तिचं काय एवढं कौतुक.. पण हिची स्पेशालिटी म्हणजे, या डायरीच्या प्रत्येक पानावर एक शब्द दिलाय. अगदी साधासा. म्हणजे उदाहरणार्थ, ‘फ्लॉवर’, ‘लिब्रा’, ‘गार्डन’, ‘शिप’... असं काहीही.. रोजच्या तारखेला एक नवा शब्द. आता आपण काय करायचं, रोज त्या शब्दाबद्दल आपल्या मनात जे काही येतंय, ते नोंदवून ठेवायचं.. हवं तर चित्र काढा, हवं तर कवितेच्या ओळी लिहा, हवं तर त्या शब्दावरून एखादी व्यक्ती आठवली तर तिच्याबद्दल लिहा.   काहीही करा. ती ‘स्पेस’ तुमची. लिहित जायचं, सुसाट सुटायचं! गेले दोन महिने या डूडल डायरीने एक नवा छंद लावलाय मला..
मित्रांनो वरवर वाचताना हे साधंसं वाटेल कदाचित. ‘त्यात काय एवढं’ असंही वाटून जाईल कोणाला.. पण यातली गंमत खरंच खूप जास्त आहे. एक मजेशीर लहानपणाचा अनुभव देते ही डायरी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, मेंदू भरकटत असतो आपला, एकाच वेळेला हजार ठिकाणी धावत असतो. त्या नाठाळ चोराला कान धरून एकाच शब्दावर थांबायला लावते. पण तोही शहाणा.. त्यातून वाट काढू पाहतो.. आणि मधल्यामध्ये आपल्याला सापडतात एकाच शब्दाशी जोडल्या गेलेल्या कितीतरी डायमेंशन्स.. एकातून दुसरी, दुसरीतून तिसरी कल्पना... आणि मग आपल्यासमोर आपल्याच बालिश चित्रांतून, चार दोन कवितांच्या ओळीतून फुललेला दिसतो रंगीबेरंगी कोलाज.. ओबडधोबड.. पण सुरेख..! गेले काही दिवस मी ही मजा अनुभवते आहे. रोज स्वतःच स्वतःला शाबासकी देते आहे. आणि सगळ्यात छान म्हणजे त्या डायरीच्या पानांतून पुन्हा पुन्हा फिरताना खळखळून हसते आहे..   
आजच्या ‘गुड मॉर्निंग’ला तुम्हीही ही सुरुवात नक्की करून पहा.. आणि सांगा मला तुमची ‘डूडल डायरी’ तुम्हाला काय देतेय ते!!

-    स्पृहा जोशी.


Thursday, February 4, 2016

स्वीकार

ओशो रजनीश. भारतातल्या विवादास्पद पण तितक्याच लोकप्रिय अध्यात्मिक गुरुंपैकी एक नाव. त्यांचे सिद्धांत, मूल्यधारणा या गोष्टींवर वाद असतील कदाचित. किंबहुना आहेतच. पण त्यांचे विचार हे अतिशय पारदर्शी आणि स्वतःला शोधत खोल खोल नेणारे आहेत.
   “जेव्हा तुम्ही स्वतःचा स्वीकार करता, ती गोष्टच तुम्हाला दुसऱ्याचा स्वीकार करण्यासाठी योग्य बनवत असते. आणि जेव्हा कोणी त्यांचा स्वीकार करतं, तेव्हाच ते ‘स्वीकारा’तला आनंद शिकत असतात. किती शांतीपूर्ण आहे हे. आणि मग तेही दुसऱ्यांना स्वीकारायला लागतात. जर संपूर्ण मानवता या बिंदूपाशी येऊन पोचली, जिथे प्रत्येकजण तो ‘जसा आहे तसा’ स्वीकारला जाईल, तर जगातली नव्वद टक्के दुःखं अशीच संपून जातील.” 
                                       – ओशो रजनीश.
.... इथेच आधी थांबायला होतं. पहिल्या ओळीवरच. स्वतःचा स्वीकार? म्हणजे काय नेमकं? आपण पूर्णपणे ओळखलेलं असतं स्वतःला? नेमकं काय हवंय स्वतःकडून, समोरच्याकडून ते आपल्याला ठाऊक असतं? कित्येकदा आपण झुली पांघरतो. वेगवेगळ्या रंगांमध्ये आपल्या रंगाला हरवू देतो. कित्येकदा आपण ‘असं’ काही करतो आहोत हेसुद्धा कळत नाही. ‘कोणासाठी तरी’ म्हणून इच्छा, स्वप्नं दडपली जातात. पण आपल्यासाठी ती सहज गोष्ट असते. निदान त्यावेळेपुरती तरी. आपण त्याला नशीब म्हणतो, प्राक्तन म्हणतो, देवाची इच्छा असंही म्हणतो. पण नेमकं त्यावेळेला आपल्याला ‘ते’ हवं होतं, की नाही याचं प्रांजळ उत्तर आपण नाही देऊ शकत. किंबहुना तसा प्रश्न विचारायलाच कचरतो आपण. कारण सरळ आहे. प्रत्येक पावलावर स्वतःला जे फसवलंय, ते ढळढळीतपणे सामोरं येईल म्हणून. त्याला तोंड द्यायला कचरत असतो आपण म्हणून.
पण मग अशा वेळेस स्वीकार कोणाचा करायचा? आपण जे आहोत, त्याचा? की आपण जे आहोत असं दाखवतो, त्याचा?? हे कळलं तरी पुष्कळ आहे. कारण या पहिल्या पायरीशी न झगडता आपण दुसऱ्या पायरीवर थेट उडी मारली तिथेच सगळा झोल झाला! डायरेक्ट दुसऱ्याचा स्वीकार. पण कसा? कारण तिथे तो बिचाराही याच डायलेमामध्ये अडकलेला असणार. खोटेपणाचा हाच खेळ.. वर्षानुवर्ष. पिढ्यानपिढ्या.. निदा फाझली फार सुंदर लिहून गेलेत.
“किसी कसाईने इक हड्डी छील कर फेंकी
गलीके मोड से दो कुत्ते भोंकते उठे
किसी ने पाँव उठाए
किसी ने दुम पटकी..
न जाने मेरा जी चाहा
अपने सब कपडे उतार कर
किसी चौराहे पर खडा हो जाऊँ
हर एक चीज पर झपटूँ
घडी घडी चिल्लाऊँ
निढाल होके – जहाँ चाहूँ
जिस्म फैला दूँ
हजारो साल की सच्चाइयों को झुठला दूँ....”
हाच तो ओशो म्हणतात तो ‘स्वतःचा’ स्वीकार.. ही ती पहिली पायरी. मग आपण स्वीकारतो ते कोणाला? की खरंतर कोणालाच नाही? या प्रश्नांचं हो/ नाही मध्ये उत्तर नाही. पण ‘जसं आहे तसं’ जगणं आणि जगू देणं याला फार मोठं धाडस लागतं. ‘जीवन अभी यही है’, आणि ‘प्रत्येक पल मरो, ताकी तुम हर क्षण नवीन हो सको’ म्हणणारे ओशो या खरेपणामुळेच एकाच वेळेला नकोसेही वाटतात, आणि हवेसेही!  

स्पृहा जोशी